- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांकडे रवाना
- ६१ केंद्रांवर २५,१६४ उमेदवार देणार परीक्षा
बेळगाव : राज्यभरात आज होत असलेल्या नागरी पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या लेखी परीक्षेसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या थेट देखरेखीखाली जिल्हा कोषागारातून प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या.
विश्वेश्वरैया नगर येथील जिल्हा कोषागार कार्यालयात ठेवण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात १५ हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून त्या विविध परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आल्या. जिल्ह्यातील परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
बेळगाव शहरातील ४६ आणि चिक्कोडी शैक्षणिक क्षेत्रातील १५ अशा एकूण ६१ परीक्षा केंद्रांवर २५ हजार १६४ उमेदवार परीक्षा देणार आहेत.
परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, चेहरा ओळखणारी (फेस रिकग्निशन) यंत्रणा आणि अत्याधुनिक तपासणी उपकरणे बसवण्यात आली आहेत. ब्लूटूथसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी ६४ ईएनटी पॅरामेडिकल पथके तैनात करण्यात आली असून, उमेदवारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. तसेच अनिवार्य गणवेश संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (KEA) आयोजित या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष तयारी केली असून, उमेदवारांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.








