- शब्दगंध कवी मंडळातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, कवयित्री आणि रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा गद्रे यांनी केले.
काव्यवाचन सत्रात स्मिता किल्लेकर यांनी विविध विषयांवरील आपल्या निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. ‘आदिमाया’ या कवितेतून आईच्या वात्सल्याचा आणि त्यागाचा हृदयस्पर्शी आविष्कार,’आधुनिक ओवी’ मधून बदलत्या समाजाचे वास्तव, तर ‘अस्तित्व’ या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि आत्मभानाचा प्रभावी वेध त्यांनी घेतला.

‘आनंदाचा ठेवा’ या अभंगातून “ग्रंथ हेच गुरु, जीवन साकारू” असा वाचनसंस्कृतीचा संदेश त्यांनी दिला. ‘बरसान’, ‘झिम्माड पाऊस’ आणि ‘आक्रोश’ या कवितांमधून निसर्ग, शेतकरी जीवन आणि विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणाऱ्या शेतीची वेदना प्रभावीपणे मांडण्यात आली. ‘गड जेजुरी’, ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘भारूड’ या रचनांमधून भक्ती, सामाजिक वास्तव आणि विसंगतींवर भाष्य करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘माझी सखी’ या कवितेने विशेष दाद मिळवली. “एका एका अक्षरात सजते, शब्दा शब्दात रंगून जाते…” या ओळींमधून कवितेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते रसिकांच्या मनाला भावले. प्रत्येक कवितेनंतर टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर झालेल्या खुल्या कवी संमेलनात मनीषा नाडगौडा, अस्मिता आळतेकर, स्नेहल बर्डे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, रेखा गद्रे, सीमा कणबरकर, गौरी धामणेकर, अपर्णा पाटील, मधु पाटील, शुभदा खानोलकर, बसवंत शहापूरकर, प्रा. महादेव खोत, सुधाकर गावडे आणि परशराम खेमने यांनी पाऊस, निसर्ग, समाज, राष्ट्रभक्ती, स्त्रीजीवन आणि मानवी मूल्ये या विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या.
अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी स्मिता किल्लेकर यांच्या कवितांचा चिकित्सक आढावा घेत त्यांच्या कवितांमध्ये मातृत्व, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, सामाजिक भान, अध्यात्म, स्त्रीमन आणि मानवी संवेदनांचा सुंदर संगम असल्याचे सांगितले. त्यांची सहज, प्रवाही आणि थेट मनाला भिडणारी भाषा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गद्रे यांनी केले, तर सुधाकर गावडे यांनी आभार मानले.







