कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित कथा कथन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ॲड. नामदेव मोरे होते. प्रा. पी. व्ही. नाकाडी यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य सावंतवाडीचे भरत गावडे यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी संस्थाध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भरत गावडे यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. गावागावांत साहित्य चळवळ उभी राहणे गरजेचे असून वाचन, लेखन आणि व्यासपीठावर आत्मविश्वासाने विचार मांडण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित होते, असे त्यांनी सांगितले.

प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी कथा कथन करताना विषयाची प्रभावी मांडणी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण वाचनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी विषयावर प्रभुत्व मिळवून प्रभावी अभिव्यक्ती विकसित करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात ॲड. नामदेव मोरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या माध्यमिक गटात ठळकवाडी हायस्कूलच्या पुष्कर प. कोलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वामी विवेकानंद हायस्कूल, उचगावच्या आमना खा. सनदी यांनी द्वितीय, तर त्याच शाळेच्या नागवेणी मा. लोहार यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

प्राथमिक गटात अतिवाड प्राथमिक शाळेच्या दिव्या द. कोले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रांजल मा. गावडे (नागनवाडी) यांनी द्वितीय, तर अनन्या ग. पाटील (तुडये) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, गौरवपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला भरत गावडे, ॲड. नामदेव मोरे, तेजस्विनी संतोष सुतार, लक्ष्मण जाधव, अक्षता र. अष्टेकर, रघुनाथ मोरे, के. जी. मेणसे, यशवंतराव मोरे, यल्लापा बुरुड, प्रणाली कणबरकर, एम. पी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण किशोर पाटील, अशोक येटले, भरत गावडे आणि प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका किरण बा. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.