- सहा ऑगस्टला शिक्षेची सुनावणी
- पूर्ववैमनस्यातून २०१९ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ गावात २०१९ मध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणात तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सात आरोपींना दोषी ठरवले आहे. मात्र, खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाल्याने उर्वरित सहा दोषींना ६ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ रोजी होन्निहाळ येथील मनियार लेआउट परिसरात पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. या वादानंतर सात आरोपींनी नागेंद्र बसाप्पा मेकलगोल (रा. सुळेभावी) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी नागेंद्र यांनी जवळील एका शेडमध्ये आश्रय घेत आतून दरवाजा बंद केला. मात्र, आरोपींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तलवार तसेच इतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नागेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने यल्लेशी महादेव तानुगोल, राघवेंद्र तुकाराम कम्मार, विशाल विठ्ठल हुदली, किरण मल्लेशी मिसाळे, चेतन विजय कवडी, राघवेंद्र अदृश्यप्पा दानप्पा आणि महेश रणधीर रामचंद्र मुरारी यांना दोषी ठरवले. सर्व आरोपी बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावचे रहिवासी आहेत.
दरम्यान, आरोपी महेश रणधीर रामचंद्र मुरारी यांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्यावरील कार्यवाही थांबविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित सहा दोषींना ६ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. आर. जी. देवरेड्डी यांनी बाजू मांडली.








