• स्विमर्स क्लब बेळगावकडून गौरव

बेळगाव : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पॅरा जलतरणपटू स्वातिक पाटील यांनी पाचवे स्थान पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्विमर्स क्लब बेळगावतर्फे सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल येथे त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

स्वातिक पाटील यांच्या या यशामागील जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सत्कार समारंभाला स्विमर्स क्लब बेळगावचे मुख्य मार्गदर्शक उमेश जी. कलघटगी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगर, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांनी स्वातिक यांचे अभिनंदन करत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वातिक पाटील यांचा प्रवास हा समर्पण, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या यशामुळे बेळगावसह संपूर्ण देशाची मान उंचावली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.