- भोज ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांसाठीचा पुढील अनुदान हप्ता वर्षभरानंतरही मिळाला नसल्याने निपाणी तालुक्यातील भोज गावातील लाभार्थ्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावातील अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली असली, तरी पुढील अनुदान न मिळाल्यामुळे घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभावती अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील १० ते १५ कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, पाया बांधकामासाठी सुरुवातीला केवळ ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला असून, त्यानंतरचा निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरांची बांधकामे रखडली असून लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, पावसामुळे अर्धवट घरे खराब होत असून, जुनी घरे पाडल्यानंतर नवीन घरे पूर्ण न झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. रखडलेला निधी तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.








