- ४८ मेंढ्या ठार ; १५ हून अधिक गंभीर जखमी
- चालक गाडी सोडून फरार
बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळवडीजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने ४८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात १५ हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून, अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बैलहोंगलहून बेळवडीकडे जाणारी भरधाव कार रस्त्यावरून जात असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर आदळली. या कळपातील मेंढ्या केंगाणूर येथील चंद्रप्पा हित्तलमनी आणि दोडवाड येथील बीरप्पा यांच्या मालकीच्या होत्या.
या अपघातात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक गाभण मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








