• सांबरा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : शालेय तसेच विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या वयोमर्यादेशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पडताळणी यंत्रणा लागू करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

निवेदनात शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये काही खेळाडू बनावट जन्मदाखले आणि चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे वयोमर्यादेचे नियम मोडून सहभागी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र आणि गुणवंत खेळाडूंवर अन्याय होत असून, क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता आणि निष्पक्ष स्पर्धेलाही धक्का बसत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर संशयास्पद प्रकरणांमध्ये वय पडताळणी चाचणी आणि कागदपत्रांची सक्तीची तपासणी बेळगाव जिल्ह्यातही लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंचे जन्मदाखले, आधार कार्ड आणि शालेय नोंदींची सखोल पडताळणी करावी, वयाबाबत संशय असलेल्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी अनिवार्य करावी, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि स्पर्धा आयोजकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. या उपाययोजनांमुळे क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता वाढून पात्र आणि गुणवंत खेळाडूंना न्याय मिळेल तसेच स्पर्धांची विश्वासार्हता अधिक बळकट होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला.

यावेळी वासुदेव पाटील, कुमार हुब्बळीकर, सोमनाथ घंटेकर, सुधीर मलायी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.