- शेतकऱ्यांना अखंड पाणीपुरवठ्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
- राजकीय चर्चांपेक्षा सिंचनाला प्राधान्य
बेळगाव : राज्यात अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदावरून राजकीय चर्चा रंगलेल्या असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नांना प्राधान्य देत हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाच्या उजव्या तीरावरील कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सिंचन व्यवस्थेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
मंत्री जारकीहोळी यांनी कालव्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे का, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच सुरू असलेल्या सिंचन कामांची प्रगती, कालव्यांची स्थिती आणि पाणी वितरणाची व्यवस्था याचा सविस्तर आढावा घेतला.
शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सिंचन व्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत कालव्यांचे व्यवस्थापन प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राजकीय घडामोडींऐवजी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सिंचन व्यवस्थेला प्राधान्य देण्याची भूमिका मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या दौऱ्यातून अधोरेखित केली.








