बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ३१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. या विक्रमी देणगीमुळे कर्नाटकातील सर्वाधिक देणगी प्राप्त करणाऱ्या मंदिरांच्या यादीत या मंदिराने पाचवे स्थान मिळवले आहे.
कर्नाटक धर्मादाय विभाग यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील प्रमुख मंदिरांच्या वार्षिक देणगी अहवालात सौंदत्तीच्या रेणुका मंदिराने उल्लेखनीय स्थान पटकावले आहे.
या यादीत कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे मंदिर प्रथम क्रमांकावर असून, भाविकांकडून वर्षभरात सुमारे १६८ कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य प्रमुख देवस्थानांचा क्रम लागतो.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला मिळालेल्या मोठ्या देणगीतून या मंदिरावरील भाविकांची श्रद्धा आणि वाढती लोकप्रियता अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे.








