- खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते हिरवा झेंडा
बेळगाव : माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव – सिकंदराबाद नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून अधिकृत प्रारंभ केला.
बेळगाव रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, हैदराबाद आणि सिकंदराबादसह एकूण तीन नवीन रेल्वे सेवा बेळगावहून सुरू करण्यात येत असून, या गाड्या आठवड्यातून तीन वेळा धावणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून या रेल्वे सेवांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी बेळगावच्या जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे शेट्टर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रेल्वे विकासाचा उल्लेख करताना त्यांनी बेळगाव – बेंगळूरू वंदे भारत रेल्वे सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचे सांगितले. तसेच बेंगळूरू – मुंबई हाय-स्पीड रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात बेळगाव – चेन्नई आणि बेळगाव – तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








