- इराणच्या इरफानला ‘बॅक थ्रो’ डावावर केले चितपट
बेळगाव : मुचंडी येथील श्री महालक्ष्मी – श्री मरगाई यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) याने इराणच्या बलदंड पैलवान इरफान इराणला थरारक लढतीत ‘बॅक थ्रो’ डावावर चितपट करत ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल ३२ मिनिटे रंगलेल्या या रोमहर्षक लढतीने हजारो कुस्तीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील सिद्धेश्वर मंदिर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला प्रचंड गर्दी झाली होती. अंतिम फेरीतील पृथ्वीराज आणि इरफान यांच्यातील लढत विशेष आकर्षण ठरली. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी एकमेकांना जोरदार झुंज दिली. निर्धारित वेळेत निकाल न लागल्याने नवीन नियमानुसार नाणेफेक करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन मिनिटांच्या नियंत्रणाच्या संधीमध्ये पृथ्वीराज पाटीलने अफलातून ‘बॅक थ्रो’ डाव टाकत इरफानला चितपट केले आणि मैदानात जल्लोष उसळला.
दुसऱ्या प्रमुख कुस्तीमध्ये पैलवान प्रशांत शिंदे याने ‘एकलांगी’ व ‘एकेरी हात’ या प्रभावी डावांच्या जोरावर अवघ्या आठव्या मिनिटाला विरेंद्र कुमारचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कर्नाटकचा कंठीरवा केसरी कामेश पाटील (कंग्राळी) याने कोल्हापूरच्या सूरज मुंडेला ‘घुटणाचित’ करत १६व्या मिनिटाला विजय मिळवला.
चौथ्या सामन्यात कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी याने सांगलीच्या मनोज पाटीलवर ‘नाकपट्टी’ डावावर मात केली. प्रेम जाधव आणि अक्षय चौगुले यांच्यातील सामना रंगतदार झाला; मात्र अक्षयला दुखापत झाल्याने ही कुस्ती अनिर्णित राहिली.
याशिवाय सचिन शिरगुप्पी, साताप्पा कोल्हापूर, कार्तिक इंगळगी, बाबू नरळे, विनायक येळ्ळूर, संभाजी परमोजी (काकती), पिल्ल्या कोल्हापूर, रामदास मोळेराखी (काकती), महांतेश (संतीबस्तवाड), सुफियान सय्यद, प्रणव (उचगाव), मंथन तिप्पानाचे, संग्राम गावडा, अफान (माजगाव), सिद्धार्थ काकतकर (मजगाव), स्वराज (सावगाव), प्रथमेश वकुंद, प्रतीक वकुंद (गणेशपूर), ओंकार पुजारी आणि प्रवीण गंदिगवाड आदी मल्लांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मैदान गाजवले.
आखाड्याचे पंच म्हणून विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, अतुल शिरोळे, बाळाराम पाटील, गणपत बन्नोशी, बाहुबली बस्तवाड, राजू माजगाव, परशुराम मोदगेकर, पिराजी मुचंडीकर, गंगाराम बाळेकुंद्री आणि बाबू कल्लेहोळ यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत राशिवडे यांनी केले. तर अमोल निपाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणहलगीच्या ठेक्यावर वातावरण भारावून टाकले.







