- नागनूर रुद्राक्षी मठाच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय ‘रोबोटिक्स स्पर्धेत’ सुवर्णयश
बेळगाव : अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या बेळगावातील दोन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावत जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित ‘कोडेव्हर रोबोटिक्स स्पर्धेत’ प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘नागनूर रुद्राक्षी मठ’ आणि बेळगाव विभागासाठी अभिमानाची ठरलेली ही कामगिरी शिक्षण, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार होऊ शकतात, याचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.
सुशांत लकप्पा बांदिवड्डार हा रिक्षाचालकाचा मुलगा असून विठ्ठल मल्लिकार्जुन गडग हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. दोघेही ‘श्री सिद्धरामेश्वर शैक्षणिक संस्थेत’ शिक्षण घेत असून, शिवबसवनगर येथील ‘नागनूर रुद्राक्षी मठा’च्या आवारात कार्यरत असलेल्या ‘STEAM-H प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’शी जोडलेले आहेत.
या विद्यार्थ्यांची प्रथम निवड अत्यंत स्पर्धात्मक अशा ‘ज्युनियर सायंटिस्ट प्रोग्राम’साठी झाली होती. या कार्यक्रमांतर्गत त्यांना संशोधनाधारित प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रकल्पांवरील काम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले. याच प्रशिक्षणामुळे त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना धार मिळाली आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
मार्च महिन्यात आयोजित प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘कोडेव्हर’ स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. बंगळुरू येथील ‘गीतम विद्यापीठात’ झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या ‘रोबोट सॉकर सिस्टिम’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळाली.
१६ व १७ मे रोजी पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेत २५ हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. विविध नामांकित खासगी व आंतरराष्ट्रीय शाळांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना सुशांत आणि विठ्ठल यांनी आपल्या तांत्रिक कौशल्य, कल्पकता आणि सांघिक कार्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
‘STEAM-H प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला’ ‘Transdisciplinary Learning Solutions Pvt. Ltd.’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. तसेच ‘नागनूर रुद्राक्षी मठाचे’ श्री अल्लामप्रभु स्वामीजी यांचे आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन संस्थेला लाभत आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेस सक्षम करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.
सुशांत आणि विठ्ठल यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण बेळगाव आणि देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर चमकू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.








