• कौटुंबिक वादातून चाकूने सपासप वार

बेळगाव : कौटुंबिक वादातून नातवानेच आजीवर धारदार चाकूने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १६) रात्री अगसगे (ता. बेळगाव) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संशयित फरार झाला आहे. याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळव्वा कलगौडा पाटील (वय ७०; रा. अगसगे) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव तर कलगौडा अप्पय्यागौडा पाटील (वय २४) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कौटुंबिक कारणातून आजी आणि नातवामध्ये वाद झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात संशयिताने घरातील धारदार चाकूने बाळव्वा पाटील यांच्यावर वार केले. यात गंभीर जखमीझालेल्या वृद्धेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर येथे पोलिस उपायुक्त एन.व्ही.बरमनी, एसीपी गंगाधर आणि पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी येथे भेट दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

  • पोलिसांकडे गेल्याच्या रागातून ?

बाळव्वा या मागील काही दिवसांपासून नातू कलगौडा याच्या स्वभावामुळे त्रस्त होत्या. तो सतत बाळव्वा यांच्याशी भांडण काढत होता. यामुळे त्यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क साधला होता. तसेच काकती पोलिसांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री येऊन त्याला समजही दिली होती. मात्र, या घटनेनंतर काही वेळात पुन्हा पोलिसांकडे गेल्याचा राग मनात धरून चाकूने हल्ला केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.