• भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात

बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणूका यल्लम्मा मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यासंदर्भात बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार विश्वास वैद्य यांनी प्रस्तावित विकास आराखड्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत भूमिपूजनाची तारीख निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये भव्य क्यू कॉम्प्लेक्स, सुसज्ज अन्नदान भवन, नवीन प्रशासकीय कार्यालय तसेच वॉकर्स झोन उभारण्याचा समावेश आहे. मंजूर निधीपैकी सुमारे १८० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ३५ कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

या विकासकामांमुळे यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात पावसाळ्यात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. पुढील पावसाळ्यापासून गाभाऱ्यात पाणी जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यल्लम्मा डोंगरावरील विद्यमान दुकानदारांना लिलाव प्रक्रियेद्वारे पुन्हा जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, एक जुने व्यापारी संकुल पाडण्यात येणार असून संबंधित दुकानदारांना पर्यायी जागा देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे सांगण्यात आले.