• सुपीक जमिनींच्या बचावासाठी नोंदवले आक्षेप

खानापूर : बेळगाव – धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र विरोध दर्शवला आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी आणि केकेकोप्प या गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबीच्या विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत प्रकल्पाविरोधात लेखी आक्षेप सादर केले.

विशेष भूमी अधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित रेल्वे मार्गाला विरोध सुरू असून हा मार्ग अत्यंत सुपीक शेती क्षेत्रातून जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या जमिनीत वर्षातून तीन पिके घेतली जातात तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते, असे त्यांनी स्पष्ट केले. परिसरात कमी खोलीवर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने ही जमीन त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाने सुपीक जमिनीऐवजी पर्यायी नापीक जमीन वापरण्याचा विचार करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी “कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन देणार नाही” असा ठाम इशारा दिला.

रेल्वे मार्गामुळे वीजवाहिन्या, जनावरांचे मार्ग, ट्रॅक्टर रस्ते तसेच पाणीपुरवठा पाईपलाईन यावर गंभीर परिणाम होईल, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकरी प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला उद्देशून राजकीय दबावाखाली निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी केली.

या आंदोलनात प्रसाद पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, मारुती लोकूर, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव, कृष्णा सिद्धानी, सुधाकर पाटील यांच्यासह गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप्प, हलगीमर्डी आणि नागेनहट्टी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.