- झाडे व खांबावरील बॅनर-होर्डिंग्ज हटवले
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी कॅम्प परिसरासह हिंडलगा रोड आणि गणेशपूर रोडपर्यंत विविध ठिकाणी रस्त्यांवर, झाडांवर तसेच विजेच्या खांबांवर लावलेले बेकायदेशीर बॅनर व होर्डिंग्ज हटविण्याची व्यापक मोहीम राबवली.
या कारवाईत सकाळी मिलिटरी महादेव मंदिर परिसर, सेंट पॉल्स हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल रोड, फिश मार्केट, गवळी गल्ली, ई. डब्ल्यू. फर्नांडिस रोड, मार्केट स्ट्रेट तसेच पिकेट रोड ते गणेशपूर रोड या मार्गावरील विविध ठिकाणांवरील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले.
दुपारच्या सत्रात वनिता विद्यालय परिसर, सेंट झेवियर हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल (हिंडलगा रोड) आणि बिस्किट महादेव मंदिर ते शौर्य सर्कल दरम्यानच्या भागातही कारवाई सुरू ठेवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यांच्या कडेला लावलेले मोठ्या प्रमाणातील बॅनर व होर्डिंग्ज हटवण्यात आले.
दिवसभर चाललेल्या या मोहिमेत सुमारे ५० बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्ज काढून जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या या फलकांवर कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.








