- गायिका संगीता बांदेकर यांचे सुश्राव्य गायन : आशा भोसले यांच्या स्मृती जागवल्या
बेळगाव : सुप्रसिद्ध गायिका सौ. संगीता बांदेकर – कुलकर्णी यांनी आशा भोसले यांची अजरामर गाणी सुमधुर आवाजात सादर करुन रविवारची (२४ मे) सायंकाळ सुरिली केली. त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करुन दाद दिली.
येथील विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप सोसायटी, मराठी भाषाप्रेमी मंडळ व कलाप्रेमी निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. प्रारंभी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव याळगी, विवेकानंदचे चेअरमन कुमार पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा, संचालक अविनाश कुलकर्णी, संचालिका निता कुलकर्णी, सेक्रेटरी पद्मा बाडकर, मराठी भाषाप्रेमी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कर्नाटक राज्य विभागीय कार्याध्यक्ष परशराम माळी, गायिका संगीता बांदेकर, ध्वनी व प्रकाश योजना संयोजक गुरु पेडणेकर, विलास पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले . त्यानंतर प्रा. दत्ता नाडगौडा यांच्याहस्ते विठ्ठलराव याळगी यांचा तसेच गायिका संगीता बांदेकर व त्यांच्या साथीदारांचा विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जय शारदे वाघेश्वरी या गाण्याने संगीता बांदेकर यांनी मैफिलीची सुरुवात केली. यानंतर सादर केलेल्या प्रत्येक गाण्याने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. आशा भोसले यांनी गायलेली एकापेक्षा एक सरस हिंदी, मराठी गाणी सादर करुन त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी मागे उभा मंगेश, युवती मना दारुण मन, का रे दुरावा, धुंदी कळ्यांना, जीवलगा कधी रे येशील तू, रेशमाच्या धाग्यानी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, गोमू संगतीने माझ्या तू येशील का, चंद्र आहे साक्षीला ही मराठी गाणी सादर केली. त्यानंतर ये रातें ये मौसम नदीका किनारा (दिल्ली का ठग), ऑंखोके मस्तीके (उमराव जान), जाइये आप कहां जायेंगे (मेरे सनम), ऑंखोसे जो उतरी है दिल में (फिर वही दिलं लाया हूॅं), मांग के साथ तुम्हारा (नया दौरा), दिवाना हुआ बादल (काश्मीर की कली), साथी रे भूल न जाना (कोतवालसाब), मेरा कुछ सामान आपके पास पडा है (इजाजत), पिया तू अब तू आ जा (कारवाॅं), दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण) ही विविध प्रकारची हिंदी गाणी गायली. देव आनंदच्या हम दोनो चित्रपटातील अभी न जावो छोडकर दिल अभी भरा नही या साहील लुधियानवींच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली. नितीन देसाई (सहायक गायक), सुनिल गुरव ( की बोर्ड), गणेश साळोखे ( गिटार), उद्धव जाधव (बेस गिटार), स्नेहल जाधव (आक्टोपॅड), भार्गव कांबळे (ढोलक व कांगो), अनिकेत सासणे (तबला), अर्चना नलवडे व कल्याणी चौगुला (कोरस) यांनी साथसंगत केली. निता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन केले. कुमार पाटील यांनी आभार मानले. लोकमान्य रंगमंदिर रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले होते.








