- विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन
बेळगाव : रेशन दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी आज मोर्चा काढून सर्व्हर डाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच रेशन दुकानांवरील सर्व्हर समस्या गंभीर बनली असून, सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. त्यामुळे अनेक गरीब नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांसमोर रांगेत थांबावे लागत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के तांदळाचे वाटप झाले असून उर्वरित ६० टक्के वितरण अद्याप बाकी आहे. अशातच अन्न नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीकडून दोनदा अंगठ्याचा ठसा घेण्याचा नियम लागू केल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनल्याचा आरोप करण्यात आला.
“एकदाच अंगठ्याचा ठसा उमटवताना अडचणी येत असताना दोनदा ठसा घेण्याची सक्ती अन्यायकारक आहे. पुढील महिन्यापासून केवळ एकदाच ठसा घेण्याची परवानगी द्यावी आणि सर्व्हरची समस्या कायमची सोडवावी,” अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी राजशेखर तळवार यांनी केली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांचे निवेदन स्वीकारून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दुकानदार सहभागी झाले होते.








