बेळगाव : इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून बेळगावात पेट्रोलचा दर ११० रुपये ७४ पैसे, तर डिझेलचा दर ९८ रुपये ६९ पैशांवर पोहोचला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.७० रुपयांची वाढ करण्यात आली असून, मागील दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे.

दरवाढ तात्काळ लागू करण्यात आल्याने वाहनचालक, परिवहन क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. चार वर्षांनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मूज सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.