बेळगाव : ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने तपासाची व्याप्ती वाढवली असून, मूळ गुंतवणुकीपेक्षा जादा आर्थिक लाभ मिळवलेल्या गुंतवणूकदारांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवानंद निलण्णावर यांच्या मालकीच्या शिवम असोसिएट्स कंपनीत सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. तपासादरम्यान अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ गुंतवणुकीच्या दुप्पट परतावा मिळाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

सीआयडीकडून सध्या आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, अतिरिक्त आर्थिक लाभ झालेल्या गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्यात येत आहे. काही गुंतवणूकदारांनी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत परतावा घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सीआयडी डीआयजी भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अतिरिक्त लाभाची रक्कम परत मिळविण्याच्या दृष्टीने पुढील कारवाईची तयारी करत आहे. या माध्यमातून फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.