- प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय
बेळगाव : जिल्ह्यातील मुडलगी शहरातील वड्डर गल्ली परिसरात एका २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण बंडीवड्डर असे मृत तरुणाचे नाव असून प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बंडीवड्डर हा कामानिमित्त विजयपूर जिल्ह्यातील टक्कळकी गावात गेला होता. तो १८ मे रोजी आपल्या मूळ गावी परतला होता. शनिवारी मध्यरात्री अज्ञात तरुणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मणने आपल्या नातेवाईकांना फोन करून, “माझ्यावर चाकूने हल्ला झाला आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेमागे प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, चार तरुणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन करून तपासाला गती दिली आहे.








