• बेळगाव साहित्य संमेलनात डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन

बेळगाव : समाजात वाढत चाललेली धार्मिक, भाषिक आणि सामाजिक फूट लक्षात घेता साहित्यिकांनी निडरपणे वास्तव मांडत जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. मातृभाषा ही समाजाच्या संस्कृतीशी आणि अस्मितेशी घट्ट जोडलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखा आणि मराठा मंदिर यांच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. खानापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे उत्साहात हा साहित्य सोहळा पार पडला.

“मातृभाषेतून घेतलेले शिक्षण माणसाला संस्कृतीची जाणीव करून देते. इतर भाषा व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असल्या, तरी संवेदनशील साहित्यिक, कवी आणि कलाकार घडवण्यासाठी मातृभाषेचे संस्कार अत्यावश्यक असतात,” असे डॉ. पाटणे यांनी सांगितले. सध्याच्या मूल्यहरण झालेल्या राजकारणाबरोबरच वाढत्या भोगवादी प्रवृत्ती आणि समाजात पसरत असलेल्या द्वेषपूर्ण वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे साहित्यिकांनी अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, कै. अजितदादा पवार सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन आणि पॉलिहाइड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.

संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष संजय गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर एल. पी. पाटील यांनी प्रास्ताविक मांडले. यावेळी सीमाकवी रवींद्र पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, डी. बी. पाटील आणि रणजीत चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात “छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज” या विषयावर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात लोककवी प्रशांत मोरे यांच्या “काळजातल्या कविता” या काव्यमैफलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील आणि स्मिता किल्लेकर यांनी केले. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून साहित्यप्रेमी, कवी आणि लेखक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.