- शिंपले काढताना बुडून मृत्यू
- सात महिलांचा समावेश ; तिघे बेपत्ता
कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तट्टेहक्कल समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले गोळा करत असताना अचानक समुद्राच्या पाण्याचा वेग वाढल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.
मृतांमध्ये सात महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून तिघेजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर कापेचिप्पू शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक समुद्राच्या लाटा उंचावल्याने काही जण खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर सदस्यही पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने आठ जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या दुर्घटनेबद्दल उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.








