• जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन

बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध गोहत्या आणि गोवंश वाहतुकीवर कठोर बंदी घालावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन सादर केले. कर्नाटकातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बकरी ईद दरम्यान कुर्बानीच्या नावाखाली होणाऱ्या कथित अवैध गोहत्येला आळा घालण्यासाठी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.

या आंदोलनात बोलताना मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी बकरी ईदच्या काळात होणारी गोहत्या रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरकारी आदेश असूनही काही ठिकाणी अवैध जनावर वाहतूक आणि गोहत्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू धर्मात गाईला पूजनीय स्थान असल्यामुळे अशा घटनांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर २९ मेपर्यंत जनावरांचे बाजार बंद ठेवावेत तसेच प्रमुख रस्त्यांवर पोलीस तपासणी नाके उभारून विशेष पथके नियुक्त करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनातील दुसरे वक्ते कृष्णा भट यांनी भारत हा कृषिप्रधान देश असून गोधनाची संख्या सातत्याने घटत असल्याची चिंता व्यक्त केली. काही राज्यांमध्ये गोवंश संवर्धनासाठी विशेष उपाययोजना सुरू असल्याचे सांगत त्यांनी देशभरात गोहत्या पूर्णपणे थांबवून गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात विजय जाधव, ए. एन. करलिंगण्णावर, डॉ. सुभाष पाटील, श्रीदेवी बुडवी, आनंद करलिंगण्णावर, भावकण्णा लोहार, सुनील, किरण किल्लेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.