• दोघांना अटक ; मोबाईल व रोकड जप्त

बेळगाव : शहरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट बेटिंगच्या रॅकेटवर मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत छापा टाकला आहे. ऑनलाईन मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून बेटिंग चालवणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

खडेबाजार पोलीस चौकीजवळ, उज्ज्वल नगर परिसरात मैताब अब्दुलसाब मुल्ला हा नागरिकांकडून पैसे स्वीकारून मोबाईलद्वारे आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय हुसेनसाब केरूर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे ४,००० रुपये किमतीचा मोबाईल व १,९०० रुपये रोकड जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान रोहित नावाच्या आणखी एका व्यक्तीचा सहभाग समोर आला आहे.

दुसऱ्या कारवाईत न्यू सिटी बसस्थानक परिसरात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यावर ‘क्रिकेट बेट-९९’ ॲपद्वारे बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पीएसआय शशिकुमार एस. कुरली आणि पथकाने कारवाई करत अफताला असगरअली (मूळ उत्तर प्रदेश, सध्या रामदेव गल्ली निवासी) याला अटक केली. त्याच्याकडून ५,००० रुपये किमतीचा मोबाईल आणि ४,७०० रुपये रोकड जप्त करण्यात आली.

या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.