• ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत पहिली बैठक संपन्न

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची पहिली बैठक पार पडली. बैठकीस सीईओ सुदाम मंचलवार, आमदार आसिफ सेठ तसेच सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. प्रारंभी ब्रिगेडियर उपाध्याय यांना शपथ देण्यात आली आणि विविध मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीत बेळगाव रेल्वे स्थानक कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने विविध कर आणि दंडापोटी रेल्वेकडून सुमारे १६ कोटी रुपये थकीत असल्याचा मुद्दा चर्चिला गेला. ही रक्कम वसूल करण्यासाठी नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून पुढील पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी लाच स्वीकार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या एका महिला अधिकाऱ्याबाबतही चर्चा झाली. संबंधित कर्मचाऱ्याचे ५० टक्के वेतन कपात करून उर्वरित वेतन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

रामकृष्ण मिशन यांच्याकडून हॉस्पिटल उभारणीसाठी परवानगी मागण्यात आली असून आवश्यक नियमांची पूर्तता झाल्यानंतर बांधकाम परवाना देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर उर्वरित वेतन फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

इंडिपेंडिंग रोड आणि हावलॉक रोड जंक्शनचे सुशोभीकरण करण्याबरोबरच एल अँड टी कंपनीने जलवाहिन्यांसाठी केलेल्या खोदाईनंतर रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट परिसरातील कत्तलखान्यासह इतर कोणत्याही ठिकाणी गोहत्या होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली.

दरम्यान, एसएफसी निधीत यावर्षी केवळ पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने विकासकामांवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारकडे वाढीव निधीची मागणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, त्यातून कायमस्वरूपी महसूल निर्माण करणारे प्रकल्प राबविण्याची योजना आहे. बी. के. मॉडेलसमोरील मोकळ्या जागेत बेंगळुरू विमानतळाच्या धर्तीवर फूड स्टॉल उभारण्याचा प्रस्ताव सीईओ सुदाम मंचलवार यांनी मांडला. तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्टॉल्स आणि इनडोअर स्टेडियम उभारणीबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.