- जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमधील सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिले.
मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. येत्या दोन दिवसांत शाळा व अंगणवाड्या सुरू होणार असल्याने परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, अन्न साठवण कक्ष स्वच्छ ठेवावेत तसेच अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाडी इमारतींची तपासणी करून धोकादायक किंवा कमकुवत झालेल्या इमारतींमधील वर्ग तात्पुरत्या इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले.
शाळा आणि अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची एफटीके किटद्वारे तपासणी करण्यासोबतच परिसरातील धोकादायक वीजतारा आणि विद्युत उपकरणे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही सांगण्यात आले.
१ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अंगणवाड्यांमध्ये आणि चौथ्या शनिवारी शाळांमध्ये पालक सभा घेण्याचे निर्देश देण्यात आले. वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारप्पन्नावर, बसवराज अडवीमठ, मल्लिकार्जुन कलादगी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.








