बेळगाव : बहुचर्चित ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद निलण्णावर याला बुधवारी सीआयडी अधिकाऱ्यांनी द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.
प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेत न्यायाधीश के. गंगाधर यांनी निलण्णावर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान निलण्णावर यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार करत योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी विनंती न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे स्पष्ट केले.
“बीम्स रुग्णालय येथे चांगल्या उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास केआयएमएस रुग्णालय येथेही उपचार करता येतील. पुढील उपचारांची गरज असल्यास वकिलामार्फत अर्ज दाखल करावा. तुरुंगात आरोग्य समस्या उद्भवल्यास प्रशासनाकडून उपचार केले जातील,” असे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून निलण्णावर यांनी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयीन आदेशानंतर शिवानंद निलण्णावर यांना बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृह येथे हलविण्यात आले.








