• खानापूर – हेमाडगा मार्गावरील वाहतूक बंद
  • नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

खानापूर : तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हालात्री नदीला पूर आला असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांना मोठा फटका बसला असून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

सततच्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. हालात्री नदीवरील पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्याने कोणत्याही परिस्थितीत जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

वाहतूक पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी खानापूर–असोगा–मणतुर्गा–हेमाडगा किंवा खानापूर–लोंढा–रामनगर या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हालात्री नदीवरील नवीन पुलाच्या उभारणीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांतून सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, पावसाळा संपल्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन पूल उभारल्यानंतर परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांसह गोवा राज्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा अनेक वर्षांपासूनचा वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.