• १८ नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी ; काँग्रेस हायकमांडचा निर्णय
  • शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात

बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, रिक्त असलेल्या २० पदांपैकी १८ पदे भरण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असून, त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

तीन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद उपस्थित होते. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या अंतिम स्वरूपावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिल्लीतील बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस नेते बेंगळुरूला परतले असून, सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे अंतिम मंत्र्यांची यादी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. हे दोन्ही नेते रविवारी रात्री अथवा सोमवारी सकाळी बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता आहे.

यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांकडे मंत्र्यांची अंतिम यादी पाठवतील आणि त्यानुसार नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यापूर्वीच सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

सध्या राज्य मंत्रिमंडळात २० पदे रिक्त असून त्यापैकी दोन पदे सध्या रिक्त ठेवून १८ पदे भरण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.