निपाणी : शहरातील साई शंकर नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. विहान तुषार कांबळे असे जखमी मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहान हा आपल्या घराजवळील गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी अचानक दोन भटकी कुत्री तेथे आली आणि त्यांनी विहानवर हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे मुलाला स्वतःचा बचाव करता आला नाही. कुत्र्यांनी त्याच्या हातावर, पायावर आणि मांडीवर चावे घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर विहानने मोठ्याने आरडाओरडा केल्याने त्याचे आई-वडील आणि परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत मुलाची सुटका केली. त्यानंतर जखमी अवस्थेतील विहानला तातडीने उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने मुलगा धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.