• वृद्धापवेतन , दागिने बळकावले

रायबाग : संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईलाच घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मदळगी येथे समोर आली आहे. वृद्धापकाळातील पेन्शन, गृहलक्ष्मी योजनेची रक्कम आणि दागिने बळकावल्याचा आरोप एका ७८ वर्षीय महिलेने आपल्या मुलावर केला असून या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील माडलगी येथील ७८ वर्षीय सत्यव्वा खांडेकर यांनी आपला मुलगा हलप्पा खांडेकर याच्याविरोधात तक्रार स्वरूपात आरोप मांडले आहेत. सत्यव्वा यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने कौटुंबिक मालमत्तेतील वाट्याची मागणी केली होती. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना घर सोडण्यास भाग पाडण्यात आले.

याशिवाय, शासनाकडून मिळणारे वृद्धापकाळ निवृत्तीवेतन तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदतही फसव्या मार्गाने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या अंगठ्याचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सध्या सत्यव्वा खांडेकर या चिक्कोडी तालुक्यातील बेळकुड येथे आपल्या माहेरी राहत आहेत. वृद्धापकाळात मुलाकडून आधार आणि काळजीची अपेक्षा असताना त्यांना उपेक्षा, अपमान आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी आईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. संबंधित शासकीय यंत्रणा आणि कर्नाटक ग्रामीण बँकेच्या मेकली शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.