• मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन
  • प्रथमच नियमभंग करणाऱ्यांना दंडाऐवजी ताकीद देण्याची तयारी

बेळगाव : गोव्यात प्रवेश करणाऱ्या बेळगावसह अन्य राज्यांतील वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या अवाजवी वाहतूक दंडाबाबत अखेर दिलासादायक हालचाल सुरू झाली आहे. बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रथमच किरकोळ नियमभंग करणाऱ्यांसाठी दंड कमी करण्यासह ताकीद देणारी नवी व्यवस्था लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

अलीकडच्या काळात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि इतर किरकोळ कारणांवरून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनात सदोष ई-चलन प्रणाली, वाहतूक चिन्हांचा अभाव, पर्यटक वाहनांवरील वाढता दंड आणि सर्वसामान्यांवर होणारा आर्थिक बोजा याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत, जीवघेण्या स्वरूपाचे नसलेल्या आणि प्रथमच झालेल्या नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये मोठा दंड आकारण्याऐवजी इशारा देण्याची आणि दंडाची रक्कम कमी करण्याची नवी नियामक प्रणाली लवकरच लागू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे बेळगावसह गोव्यात नियमित ये-जा करणारे प्रवासी, पर्यटक आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.