• चार प्रकारांत कचरा वर्गीकरण बंधनकारक

बेळगाव : शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेने आजपासून कचरा विल्हेवाटीबाबत नवे आणि कडक नियम लागू केले आहेत. यापुढे नागरिकांना घरातील कचरा चार वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीकडे द्यावा लागणार असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि ‘स्पेशल केअर वेस्ट’ अशा चार प्रकारांमध्ये वेगळा करणे आवश्यक राहील. हा कचरा स्वतंत्र पिशव्यांमध्ये भरून महापालिकेच्या कचरा संकलन वाहनांकडे सुपूर्द करावा लागणार आहे.

विशेषतः ‘स्पेशल केअर वेस्ट’मध्ये येणारे विजेचे बल्ब, इंजेक्शनच्या सिरिंज आणि इतर घातक वस्तू सामान्य कचऱ्यापासून पूर्णपणे वेगळ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे आयुक्तांनी सांगितले.

शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे तसेच नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.