- महाराष्ट्र एकीकरण युवा समिती – शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
खानापूर : तालुक्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवांमधील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती-शिवसेनेने प्रशासनाकडे कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यासाठी कायमस्वरूपी क्षेत्र शिक्षण अधिकारी आणि आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली.
खानापूर तालुक्यात क्षेत्र शिक्षण अधिकाऱ्यांच्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याची भूमिका समितीने मांडली. सध्या मंजुनाथ काटी यांच्याकडे बीआरसी आणि क्षेत्र शिक्षण अधिकारी या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समितीने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा दावा समितीने केला.
यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन तालुक्यात स्वतंत्र आणि कायमस्वरूपी क्षेत्र शिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षण विभागाबरोबरच आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरताही समितीने निदर्शनास आणून दिली. तालुक्यात कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती नसणे आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमित डॉक्टरांऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणे, यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना अडचणी येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
तालुक्यातील शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच कायमस्वरूपी क्षेत्र शिक्षण अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी धनंजय जाधव, अशोक घागवे, शिवसेनेचे तालुका नेते सचिन गोराळे, नारायण मुचंडीकर, सूरज जाधव, विकास कलघटगी, श्रीकांत नंदूरकर, जोतिबा येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.








