बेळगाव : शहरातील सह्याद्री नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागल्याची घटना घडली. यावेळी घरात असलेल्या दोन लहान मुलांना घरमालकीण श्रीदेवी जोशी यांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सह्याद्री नगरातील श्रीदेवी जोशी यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर रूपा नाशीपुडी या आपल्या दोन मुलांसह भाड्याने राहतात. अमावास्येनिमित्त रूपा या घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या होत्या. त्याचदरम्यान घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. घरातून धूर येऊ लागला आणि आतील दोन्ही मुले घाबरून ओरडू लागली.
मुलांचा आवाज ऐकताच घरमालकीण श्रीदेवी जोशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धुराने भरलेल्या घरात प्रवेश करून त्यांनी दोन्ही बालकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मुलांचे प्राण वाचले. या प्रसंगात दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल श्रीदेवी जोशी यांचे कौतुक होत आहे. ही घटना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.








