• शिवानंद महाविद्यालयात विशेष व्याख्यान व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
  • निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

कागवाड : “वाचन म्हणजे केवळ शब्द वाचणे नव्हे, तर त्यामागील आशय, विचार आणि भावना समजून घेणे होय. साहित्यकृती वाचताना तिचे आकलन झाले पाहिजे. त्यातील भावनांचा स्वर आपल्या काळजापर्यंत पोहोचला पाहिजे. वाचनातून विद्यार्थ्यांची संवेदनशीलता वाढून जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते नव्हे, तर जीवन समजून घेण्यासाठी वाचन करावे,” असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले.

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभाग आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी विशेष व्याख्यान व निबंध-वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार होते. व्यासपीठावर शब्द गंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सचिव सुधाकर गावडे, आय. क्यू. ए .सी. अधिकारी प्रा. बी डी दामन्नावर, मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, प्रा. एम. एल. कोरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पोतदार यांनी वि. स. खांडेकर यांच्या ‘अमृतवेल’ कादंबरीचा संदर्भ देत त्यांनी साहित्यकृतीतील आशय समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिदशा हा व्यक्तिमत्त्व घडणीचा महत्त्वाचा काळ असून या काळात विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे, नवनवीन गोष्टी शिकाव्यात, एखादी कला आत्मसात करावी आणि कविता, कथा लेखनातून आपल्या सर्जनशीलतेला वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले.

निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते. भाषेवरील प्रभुत्व, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित होते. स्पर्धेत बक्षीस मिळविण्यापेक्षा त्यासाठी केलेली तयारी, मिळालेले ज्ञान आणि अनुभव अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धात्मक उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी आपल्या मनोगतात राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने सीमाभागात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिरुची निर्माण व्हावी, त्यांच्या लेखन व वक्तृत्व कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, भाषिक कौशल्य, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच नामवंत साहित्यिकांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अनन्या कुलकर्णी हिने सादर केलेल्या मानवतेच्या गीताने झाली. प्रा. डॉ. शिल्पा ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मराठी विभागप्रमुख प्रा. अशोक आलगोंडी यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रा. एम. एल. कोरे यांचा मराठी विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर निबंध व वक्तृत्व स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास शब्दगंध कवी मंडळ संघाचे गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, डॉ. अमोल पाटील, लक्ष्मण सुर्यवंशी, शिरगुप्पे सर, सचिन माने, प्रा. जे. के. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. माधुरी कांबळे आणि कु. शर्वरी पाटील हिने केले. विजेत्या स्पर्धकांची नावे कु. धनश्री माळी हिने जाहीर केली. आभारप्रदर्शन कु. शुभम बोरगावे यांनी मानले.