• १२ प्रवासी जखमी : राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भीषण अपघात

संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात संकेश्वरनजीक राष्ट्रीय महामार्ग ४८ वर केएसआरटीसी बसने टिप्परला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर १२ प्रवासी जखमी झाले.

गंगावतीहून बेळगावमार्गे कोल्हापूरकडे जाणारी नॉर्थ ईस्टर्न कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (एनईकेआरटीसी) बस प्रवास करत असताना हा अपघात घडला. बसने समोर चाललेल्या टिप्परला मागून धडक दिली. या धडकेत चालक संगप्पा तळवार यांचा जागीच मृत्यू झाला. ते गदग जिल्ह्यातील रोणा तालुक्यातील सावडी गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने संकेश्वर तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक उपचारांची गरज असलेल्या जखमींना पुढील उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.