- बेळगाव – विजापूर जिल्ह्यातील १४ संघांचा सहभाग
बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड युनिट कॉलेजच्या नेतृत्वाखाली कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरमहाविद्यालयीन एकल विभागीय हॉकी स्पर्धा गुरुवारी (दि. ८) टिळकवाडी येथील लेले (सुभाषचंद्र) मैदानावर झाली. बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या १४ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
- खेळामुळे शारीरिक – मानसिक आरोग्य सुधारते
बेळगाव हॉकीचे सरचिटणीस सुभेदार सुधाकर चाळके यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. खेळाडूंसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांची क्रियाशीलता आणि आरोग्य सुधारते. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात सहभागी होऊन आपली क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.
- तरुणांनी खिलाडूवृत्ती जोपासावी
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील यांनी तरुणांनी खेळाचे महत्त्व समजून घेऊन खिलाडूवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. करुणा आम्रिस्कर उपस्थित होत्या. हर्षिता यांनी स्वागत केले. रुपाली अनिल गोडा आणि नेत्रा जवेजर यांनी परिचय करून दिला, तर डॉ. महांतेश डी. यांनी सूत्रसंचालन केले.








