• फॉर्म ७ च्या कथित गैरवापराचा आरोप
  • मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

बेळगाव : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देत बेळगावात युवा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. मतदार यादीतून कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने नावे वगळली जात असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बेळगाव जिल्हा युवा काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. दिल्लीत आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह कार्यकर्त्यांशी पोलिसांनी केलेल्या कथित असभ्य वर्तनाचा निषेधही युवा काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

युवा काँग्रेसचे नेते राहुल जारकीहोळी यांनी एसआयआर प्रक्रिया आणि फॉर्म ७ च्या कथित गैरवापरातून देशभरातील मतदारांची नावे वगळण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशभरात १३ कोटींहून अधिक, तर कर्नाटकात एक कोटीहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या बूथसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांना लक्ष्य करून मतदार यादीतून नावे हटवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • निवडणूक आयोगाविरोधातही घोषणाबाजी

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम न करता केंद्र सरकारच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ईडी आणि सीबीआयप्रमाणेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून संबंधित आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच हा मुद्दा घेऊन राज्यभरातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला.

या आंदोलनात युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.