• शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या अजित पाटील यांच्यावर अचानक हल्ला
  • उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील भडांगे कॉलनीतील रहिवासी अजित वासुदेव पाटील (वय ६१) यांचा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अजित पाटील हे सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधमाशांच्या हल्ल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने ते वाटेतच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकऱ्याने गावात कळविले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजित पाटील यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अजित पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेत परिसरात मधमाशांची पोळी किंवा वस्ती आढळल्यास विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतीच्या कामासाठी जाताना मधमाशांच्या वस्तीला अनावधानाने धक्का लागणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेऊन एपीएमसी उत्पन्न बाजार समिती तसेच संबंधित प्रशासनाने अजित पाटील यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

अजित पाटील यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता दर्शन तलावानजीक असलेल्या गावडे वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.