- ३० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविकांची उपस्थिती
निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भोंब पौर्णिमेनिमित्त होणारी पाचदिवसीय यात्रा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी श्रींची पालखी व सबिना सोहळा होईल. रात्री ढोलजागराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ढोलजागरानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा होईल. त्यानंतर उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होणार आहे.
- २९ ऑक्टोबरला यात्रेचा मुख्य दिवस
२९ ऑक्टोबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून, दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येईल. त्यानंतर उत्तररात्री नाथांची मुख्य दुसरी भाकणूक होईल.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन पाचदिवसीय यात्रेची सांगता होईल.
दरवर्षी भोंब पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. नाथांचे निस्सीम भक्त भगवान डोणे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांच्याकडून भाकणूक केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक या यात्रेसाठी कुर्ली-आप्पाचीवाडी येथे दाखल होत असतात.








