- इतर सात कैद्यांच्या बदलीला कारागृह विभागाची मंजुरी
बेळगाव : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूमधील परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलवण्याच्या निर्णयाला राज्य कारागृह आणि सुधार सेवा विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, अन्य सात कैद्यांच्या कारागृह बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
परप्पन अग्रहारा कारागृहात मोबाईल फोनचा बेकायदेशीर वापर झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. यानंतर प्रज्वल रेवण्णा यांच्यासह सात जणांना वेगवेगळ्या कारागृहांत हलवण्याची शिफारस पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, कारागृह प्रशासनाने प्रज्वल रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलवण्याचा आदेश जारी केला होता.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी परप्पन अग्रहारा कारागृहात छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान प्रज्वल रेवण्णा यांच्या कोठडीत मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह आढळून आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रज्वल रेवण्णा, कारागृह अधीक्षक प्रकाश गायवे यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट जामीनपत्र तयार केल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या शंकर आणि अरमुगम या कैद्यांसह कारागृहातील प्रथम श्रेणी सहाय्यक श्रीकांत यांचीही अन्य कारागृहात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ कारागृह अधिकारी सोमशेखर यांनाही अटक झाली आहे.
प्रज्वल रेवण्णा यांच्या कारागृह बदलीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोमशेखर यांच्याकडे होती. मात्र, त्यांनाच अटक झाल्यानंतर पोलीस महासंचालक (कारागृह) आलोक कुमार यांनी बदलीच्या आदेशाचा फेरआढावा घेतला. सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीशी संबंधित बाबी विचारात घेऊन प्रज्वल रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलवण्याची प्रक्रिया तूर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे.








