- ५,३३० रुपये रोख आणि मोबाईलसह जुगाराचे साहित्य जप्त
बेळगाव : शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत ५,३३० रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
८ ऑक्टोबर रोजी माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय श्रीशैल हुलगेरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सागर कॉलनीतील सिद्धेश्वर हिल परिसरातील एका सार्वजनिक ठिकाणी आकड्यांवर पैसे लावून मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी मटका जुगारात सहभागी असलेल्या आफताब अख्तर शानावले (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५,३३० रुपये रोख रक्कम, अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
जुगारातून जमा होणारी रक्कम जिया बॉय (वीरभद्र नगर, बेळगाव) याच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.








