• मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून घरात घुसून दोन भावांची निर्घृण हत्या
  • पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती (यरगट्टी) तालुक्यातील नुग्गानट्टी गावात मालमत्तेची विभागणी आणि जमिनीच्या भूमापनाच्या वादातून भीषण दुहेरी हत्याकांड घडले आहे. घरात घुसून दगड, काठ्या, लोखंडी सळ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुग्गानट्टी गावात जमिनीची विभागणी आणि मालमत्तेच्या हक्कावरून संबंधित कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. नुकतेच जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. मध्यरात्री अण्णव्वा आणि तिचे पती यल्लाप्पा यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाद सुरू असतानाच आरोपी काठ्या, लोखंडी सळ्या, दगड आणि धारदार शस्त्रे घेऊन घरात घुसले. त्यांनी घरातील सदस्यांवर बेछूट हल्ला चढवला. या हल्ल्यात लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) या दोन्ही भावांचा गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच फकिरप्पा नीलप्पा रामण्णवर आणि घरातील दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आठ मुख्य आरोपींना अटक केली आहे.

या दुहेरी हत्येची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि पोलीस उपअधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पुरावे संकलित करून आरोपींविरुद्ध कारवाईला गती दिली आहे.

या गुन्ह्यामागे केवळ मालमत्तेचा वाद होता की इतर काही कारणेही आहेत, याचा तपास सुरू असून, या हल्ल्यात आणखी कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, आरोपींना बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची मदत मिळाली होती का, याचाही सर्वंकष तपास मुरगोड पोलीस करत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.