• रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी कारवाई
  • शहर सौंदर्यीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष अभियान

बेळगाव : शहरातील सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करून वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्डाने सोमवारी विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बोर्डाच्या अलीकडील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली असून, नागरिक आणि वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला.

मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट परिसरातील रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने, तात्पुरती बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली. पादचाऱ्यांच्या वावरात अडथळा ठरणारी शेड आणि इतर संरचनाही यावेळी हटवण्यात आल्या.

यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मुख्य रस्ते आणि फूटपाथ व्यापून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना सार्वजनिक जागांवर अतिक्रमण न करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.

यापुढे सार्वजनिक रस्ते, फूटपाथ किंवा इतर जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.