- तक्रारदारच निघाला मुख्य आरोपी ; ६५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- स्वतःच दुकानातील दागिने व रोकड लपवून पोलिसांत खोटी तक्रार
बेळगाव : शहरातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स या सराफी दुकानात झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या दुकान मालकानेच संपूर्ण कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, त्याच्याकडून तब्बल ६५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित सराफा व्यावसायिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील रहिवासी आणि सराफा व्यावसायिक कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला होता.
तक्रारीनंतर खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय तक्रारदारावरच गेला.
त्यानंतर कृष्णानंद वेर्णेकर यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी स्वतःच दुकानातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड काढून ती आपल्या ॲक्टिव्हा स्कूटरच्या डिक्कीतून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत पोलिसांनी ६२ लाख ६० हजार ९९० रुपये किमतीचे ५१९.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजार रुपये किमतीचे ३१ ग्रॅम चांदीचे दागिने, २ लाख ८३ हजार ११० रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा स्कूटर असा एकूण ६५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात तक्रारदारच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. तसेच, गुन्ह्याचा वेगाने छडा लावणाऱ्या खडेबाजार पोलीस पथकाचे त्यांनी विशेष कौतुक केले.








