• प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने
  • मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बेळगाव : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा कर्मचारी संघाच्या बेळगाव व चिकोडी जिल्हा शाखांच्या वतीने शनिवारी बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सदाशिव ईरेश सांभाळ यांनी आंदोलनादरम्यान शिक्षकांच्या समस्यांवर भाष्य करताना, निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा नसल्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर सेवा बजावलेल्या शिक्षकांना वृद्धापकाळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हुक्केरी माध्यमिक शाळा कर्मचारी संघाचे सदस्य रमेश बडीगेर यांनीही शिक्षकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या घडणीत व्यतीत करणाऱ्या शिक्षकांना निवृत्तीनंतर आर्थिक संरक्षण मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरूच ठेवला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी इतर शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनीही जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत, निवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेन्शनची हमी आवश्यक असल्यावर भर दिला. शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा कर्मचारी संघाचे बेळगाव व चिकोडी जिल्ह्यातील पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.