• अफवांना पूर्णविराम ; बेळगावला आणखी एका मंत्रीपदाची आग्रही मागणी

बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसून त्यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना तथ्य नसल्याचे स्पष्ट करत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आम्ही गेली तीन दशके एकत्र काम करत असून आमच्यात कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले, “सिद्धरामय्या आणि आमच्यात कोणताही मतभेद नाही. आम्ही पूर्वीही एकत्र होतो आणि आजही एकत्रच आहोत. प्रसारमाध्यमांमध्ये विनाकारण मतभेदांचे चित्र रंगवले जात आहे. आमच्यात कोणताही संभ्रम किंवा अडचण नाही. सध्या निर्माण झालेली ही चर्चा फार काळ टिकणार नाही.”

केपीसीसीच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलताना त्यांनी पक्षाच्या नव्या नेतृत्वाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. नवीन संघटनात्मक टीम पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल आणि त्यामध्ये आपणही सक्रियपणे सहभागी राहू, असे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्ली दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले की, योग्य वेळी पक्षश्रेष्ठींची भेट घेणे ही नियमित प्रक्रिया आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाली असून संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका पक्ष नेतृत्वापुढे मांडण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चर्चा लवकरच होणार असून अंतिम निर्णय काँग्रेस हाय कमांड घेणार आहे.

पक्षात नवीन आणि पात्र चेहऱ्यांना संधी दिल्यास संघटना अधिक बळकट होईल, अशी पक्षश्रेष्ठींची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बेळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत जारकीहोळी यांनी जिल्ह्याला मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रीपद मिळावे, ही आपली ठाम भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.